उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत पाण्याचा निचरा होत नसल्याने पाण्यातून वाट काढत शाळकरी मुले, व्यावसायिक, नागरिक, व वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. अखेर या सर्वांवर उरुळी कांचन ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, व लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पाण्याला मार्ग काढून दिल्याने वाहनचालकांना दिलासा दिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आशीर्वादाने पावसाचे पाणी जाण्यासाठी उघडे नसलेले चेंबर यामुळे पावसाच्या पाण्याने संपूर्ण रस्ता जलमय झाला होता. त्यामुळे रस्त्यावर नदी अवतरल्याचे चित्र होते. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील इरीगेशन कॉलनी, चौधरी माथा, हरणा कॉम्प्लेक्स समोर व उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्रासमोरील परिसरात पाणी साचून राहत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहतुकीच्या गैरसोयी बाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.
पाण्यातून रस्ता काढताना वाहनांची गती मंदावत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. तसेच या परिसरातून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत असल्यामुळे उरुळी कांचन ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, व लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी स्वतः काम केले व महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांचे होणार हाल कमी करण्यास मदत केली. वाहन चालकांची पाण्यातून वाट काढताना मोठी दमछाक होत असे. पाण्याचा आणि खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागली. तर कार चालकांना जणू नावेत बसल्याची अनुभुती आली.
पुणे -सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनसह परिसरात महामार्गावरील पाणी जाण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने पाण्याचा निचरा होण्यास कुठेही वाव नाही. या ठिकाणी या अगोदरही अनेक वेळा गंभीर अपघात झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणची गटारलाईन साफ करुन व चेंबर मोकळे करून पाणी वाहून जाण्याकरिता चेंबर खुले करण्याची मागणीने जोर धरला आहे.
दरम्यान, भर पावसात उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, सुभाष बगाडे, दत्तात्रय कांचन, शुभम काळे, लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सदर महामार्गावरील साचलेले पाणी काढून दिले.