उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह परिसरात सध्या पाण्याचा तुटवडा जानवू लागला असून, शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची ही तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे “धरण आहे उशाला आणि कोरड पडली घशाला” अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची भावना सध्या नवीन मुळा-मुठा उजव्या कालव्यावर अवलंबून असलेले शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.
मागील अनेक दिवसांपासून नवीन मुळा -मुठा बेबी कालवा बंद असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीला पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पुणे शहराबरोबरच जिल्ह्यातील दौंड, इंदापूर व हवेली या तिन्ही तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी व शेतीला वापरासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडले जाते. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही कालव्याला पाणी नसल्याने शेतकरी, व नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
खडकवासला धरणातून शेतीच्या आवर्तनात घट होत चालली आहे. असा आरोप शेतकरी करू लागले आहेत. अशातच कालव्यावरच पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, सोरतापवाडी, उरुळी कांचन या मोठ्या गावांचा पिण्याचा प्रश्न अवलंबून असल्याने पिण्याची समस्या उभी राहू लागली आहे. कालव्यालगत छोट्या गावांचे पिण्याचे स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे आवर्तनाचा फटका शेती व नागरी लोकसंख्येला बसायला सुरु झाली आहे. रब्बी हंगामाच्या मध्यावरच प्रामुख्याने हवेली व दौंड तालुक्यातील विहिरी व कूपनलिकांत पाणी कमी झाले आहे.
दरम्यान, उरुळी कांचन व पंचक्रोशीतील तरडे, वळती, शिंदवणे आदी गावांच्या पाणी पुरवठा योजना या नवीन मुठा कालव्यावर पुर्णपणे अंवलबुन आहेत. पाठबंधारे विभागाने कालव्यातुन पाणी सोडण्यास बंद करताच, पूर्व हवेलीतील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरी जावे लागते. उरुळी कांचन ग्रांमपंचायतीने शिंदवणे गावाच्या हद्दीतील जेजुरी रस्त्यावरील काळेशीवार या ठिकाणी असलेल्या मुठा उजवा कालवा पुलाजवळ असलेले गेट बंद करून नव्या कालव्यात पाणी अडविले आहे. या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो.
शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची ही तीव्र टंचाई जाणवत आहे. विविध भागात शेतकऱ्यांची हाता-तोंडाशी आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. बेबी कालव्याला पाणी नसल्याने उरुळी कांचनसारख्या मोठ्या गावांच्या पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे लवकर पाणी सोडावे.
संतोष कांचन, माजी सरपंच, उरुळी कांचन, (ता. हवेली)
पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, सोरतापवाडी व परिसरात दुष्काळाची तीव्र स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जर खडकवासला कालव्यातून पाणी आले तर तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता कमी होईल आणि बळीराजाला दिलासा मिळेल.
अशोक चौधरी, नर्सरी व्यावसायिक, सोरतापवाडी, (ता. हवेली)
खडकवासला धरणातून आवर्तन सोडण्याचे नियोजन केले आहे. येणाऱ्या 20 तारखेला आवर्तन सोडण्यात येणार आहे.
श्वेता कुऱ्हाडे, अभियंता, पाटबंधारे विभाग, खडकवासला