लोणावळा : पवना धरण परिसरात पुण्यातून फिरायला आलेले दोन पर्यटक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले असल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. 05) दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुधिवरे परिसरात ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयूर रविंद्र भारसाके (वय 25) तर तुषार रविंद्र अहिरे (वय -26, दोघेही सध्या रा. पुणे, मुळ, रा. लालजैन मंदिराच्या पाठिमागे, पद्मावती नगर, वरणगांव, भुसावळ) असे बुडालेल्या पर्यटकांची नावे असून ते बालेवाडी येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होते.असून यातील मयूर भारसाके याचा मृतदेह सापडला असून तुषार अहिरे याचा शोध घेतला जात आहे.
लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड येथे मयूर भारसाके आणि तुषार अहिरे हे कंपनी मध्ये नोकरी करत होते. याच कंपनीतील आठ ते दहा मित्र दुधिवरे गावच्या हद्दीत पवना धरण परिसरात फिरण्यासाठी गेले. यावेळी ते पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले होते. पोहताना मयत मयूर आणि तुषार यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील पाण्याची खोली जास्त असल्यामुळे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले .
पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मयूर भारसाके आणि तुषार आहेर हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. आपले मित्र डोळ्यादेखत पाण्यात बुडत असताना मित्रांनी आरडाओरड केल्यावर स्थानिक ग्रामस्थ आणि लोणावळा ग्रामीण पोलीस तसेच शिवदुर्ग रेस्क्यू टीमने या दोघांचा पवना धरणाच्या पाण्यात शोध घेतला.
दरम्यान, रात्री उशिरा मयूर याचा मृतदेह सापडला तर तुषार अहिरे याचा शोध घेतला जात आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने पवना धरणात बुडून मृत्यू झाल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगीतले.