अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर कोरेगाव भीमा आणि तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये मोबाईल चोरी, पाकीटमारी आणि सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

जनजागृती, लाऊडस्पीकरद्वारे सूचना आणि विशेष पेट्रोलिंगच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून दोन संशयित महिलांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे.
आठवडे बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक, शेतकरी आणि व्यापारी उपस्थित राहत असल्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या घटना घडत असल्याची बाब लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
बाजार परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असून मोबाईल, पर्स आणि दागिन्यांची काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत.
बाजारात गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी वाघोले, पोलीस हवालदार अमोल दांडगे आणि पोलीस कॉन्स्टेबल नारायण वाळके यांच्या पथकाला दोन महिला संशयास्पद हालचाली करताना आढळल्या. त्यांच्यावर लक्ष ठेवले असता त्या एका लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचा दागिना चोरण्याच्या प्रयत्नात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तत्काळ कारवाई करत पोलिसांनी सारिका राजू जाधव वय ४२ आणि साक्षी मेघराज पवार वय ३० दोघी रा.मंतरवाडी, हडपसर, पुणे) यांना ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान त्या बाजारात येण्याचे समाधानकारक कारण सांगू शकल्या नाहीत. पुढील तपासात त्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल व सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने बाजारात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोन्ही महिलांविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार हनुमंत गिरमकर हे करीत आहेत.
आठवडे बाजारात विशेष पेट्रोलिंग, वाहतूक नियोजन आणि जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नागरिकांनी आपले मोबाईल, पर्स व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर
ही मोहीम पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल , अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, सोमनाथ कचरे, पोलीस अंमलदार श्रावण गुपचे, अमोल दांडगे, पंडित मांजरे, संदीप इथापे आणि अमोल चव्हाण यांनी राबविली आहे .







