पुणे: पुण्यातील आयटी हब हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसराला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित मेट्रो लाईन-3 चे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या मार्गावरील 23 स्थानकांपैकी पहिल्या टप्प्यात 12 मेट्रो स्थानके प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार असून उर्वरित 11 स्थानके डिसेंबर 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहेत. ही माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने पत्रकार परिषदेत दिली.

शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रो लाईन-3 ची एकूण लांबी सुमारे 23 किलोमीटर आहे. या संपूर्ण मार्गावर 23 मेट्रो स्थानके उभारण्यात येत आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात बाणेर येथील स्वर्गीय आर. के. लक्ष्मण संग्रहालय परिसरापासून हिंजवडी आणि मानपर्यंतची 12 स्थानके सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या 12 स्थानकांचे काम जवळपास पूर्ण झाले असून 30 जूनपर्यंत उर्वरित कामेही पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर आवश्यक तांत्रिक चाचण्या आणि मंजुरी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारशी संपर्क साधला जाणार असून, सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास 15 जुलैपर्यंत या मार्गावरील पहिल्या टप्प्याची सेवा प्रवाशांसाठी खुली होऊ शकते.
पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी यांनी सांगितले की, मेट्रो सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर, बाणेर, हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे या मार्गावर धावणाऱ्या सर्व मेट्रो रेल्वेगाड्यांचे संचालन महिला चालकांकडून केले जाणार आहे.
दरम्यान, पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक या मेट्रो सेवेची अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत. त्यामुळे मेट्रो लाईन-3 सुरू होण्याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.







