पुणे: लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय तरुणाचा खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्याच्या आनंदात असलेल्या या तरुणाच्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट झाल्याने कुटुंबीय आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

केतन विशाल अग्रवाल (वय 24) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विशेष नियोजन करत होता. 19 जून रोजी तिचा वाढदिवस असल्याने महाबळेश्वर येथे सेलिब्रेशनची तयारी करण्यात आली होती. त्याआधी कुटुंबीय आणि मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी तो गेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, किल्ल्यावर फिरत असताना फोटो काढण्याच्या प्रयत्नात केतन खोल दरीजवळ गेला. यावेळी त्याचा तोल जाऊन तो सुमारे 350 फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
केतनचा विवाह पुढील महिन्यात होणार होता. लग्नासाठी दोन्ही कुटुंबांकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू होती. जयपूर येथे लग्न समारंभासाठी भव्य पॅलेस आरक्षित करण्यात आला होता. तसेच पाहुण्यांच्या प्रवासासाठी विशेष विमानांचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र लोणावळा, वनजीव रक्षक संस्था, ट्रेकर्स आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. घनदाट झाडीतून मार्ग काढत बचाव पथकाने केतनला दरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
केतन हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.






