पुणे: अमली पदार्थांच्या गैरवापरावर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अँटी नार्कोटिक्स सेल-1 यांनी संयुक्त कारवाई करत ट्रामाडोलयुक्त औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात औषधसाठा जप्त करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

अँटी नार्कोटिक्स सेल-1 ला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुकेश भुराराम सिरवी (वय 28) हा कोणताही वैध औषध विक्री परवाना नसताना SPAS-TRASCEN-PLUS या ट्रामाडोलयुक्त औषधाची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर FDA आणि पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून ताडीवाला रोड परिसरात छापा टाकला.

तपासणीदरम्यान SPAS-TRASCEN-PLUS या औषधाचा मोठा साठा आढळून आला. या औषधामध्ये Dicyclomine Hydrochloride, Tramadol Hydrochloride आणि Acetaminophen यांचा समावेश आहे. कारवाईत एकूण 73 बॉक्समधील 10,492 कॅप्सूल्स जप्त करण्यात आल्या. जप्त मालाची अंदाजे किंमत 68,328 रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या साठ्यामध्ये सुमारे 424.06 ग्रॅम ट्रामाडोल आढळून आले. हे प्रमाण NDPS कायद्यानुसार व्यावसायिक (Commercial Quantity) श्रेणीत मोडत असल्याने प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे.
तपासादरम्यान या औषधांचा पुरवठा निलेश मोघे याच्यामार्फत होत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मुकेश सिरवी आणि निलेश मोघे या दोघांना अटक केली. तसेच या बेकायदेशीर पुरवठा साखळीतील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये कलम 8(क), 22(क) आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कारवाईबाबत कठोर भूमिका व्यक्त केली आहे. ट्रामाडोलसारख्या औषधांचा गैरवापर युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढवणारा असून सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका आहे. अशा बेकायदेशीर व्यवहारांमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.







