पुणे : पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी भाजप नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात महापालिकेत मांडलेल्या पत्राला नगरसेवक सुहास टिंगरे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्यानंतर भाजपकडून टिंगरे यांच्याही निधीवर कारवाई झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत टिंगरे यांच्या ‘स’ यादीतील सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी भाजप नगरसेवकांच्या प्रभागांकडे वळविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या वादाची पार्श्वभूमी अमोल बालवडकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील जुना राजकीय संघर्ष असल्याचे बोलले जात आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात जिल्हा नियोजन समिती, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम तसेच इतर निधीतून झालेल्या विकासकामांबाबत तक्रारी असल्याचा दावा करत बालवडकर यांनी स्थायी समितीकडे चौकशी आणि विशेष लेखापरीक्षणाची मागणी केली होती. कोथरूडमधील चार जलतरण तलावांसह विविध विकासकामांची स्वतंत्र आणि कालबद्ध चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.

भाजपने हा प्रस्ताव दप्तरी दाखल केल्यानंतर बालवडकर यांच्या प्रभागातील ‘स’ यादीतील १२ कोटी रुपयांचा निधी काढून घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. बालवडकर यांच्या पत्रावर स्वाक्षरी केल्यामुळे सुहास टिंगरे यांच्याही निधीचे पुनर्वाटप करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.

दरम्यान, महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून बालवडकर यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पुरेसा निधी आणि सभागृहात बोलण्याची संधी देऊनही भाजपवर सातत्याने टीका केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर बालवडकर यांनी पलटवार करत पुणे महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादी युतीबाबतच प्रश्न उपस्थित केले. या वादाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, बालवडकर यांनी प्रस्तावित शिवस्मारकाच्या निधीवरूनही चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. गेल्या सात वर्षांपासून शिवस्मारकासाठीचा निधी पूर्ण झालेला नसून चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी एक रुपयाचाही निधी दिला नसल्याचा दावा त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या आमदार आणि नगरसेवकांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन बालवडकर आणि टिंगरे यांच्या प्रभागांना विकास निधी देण्याची मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिका भवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रत हातात घेऊन भाजपविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. राजकीय संघर्षाचा फटका नागरिकांच्या विकासकामांना बसू नये, अशी भूमिका बालवडकर यांनी मांडली.






