पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंदिरातील विकासकामांमुळे दर्शन व्यवस्थेवर विविध निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र आता पुणे जिल्हा प्रशासनाने भाविकांना मोठा दिलासा देत ऑनलाइन नोंदणी किंवा दर्शन पासशिवाय थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

भीमाशंकर मंदिरातील मुख्य सभामंडपाचे नूतनीकरण आणि इतर पायाभूत सुविधांची कामे सुरू असल्याने गेल्या 5 महिन्यांपासून दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. 15 जून रोजी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले होते. मात्र सुरुवातीला सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाइन नोंदणी आणि दर्शन पास अनिवार्य करण्यात आला होता. त्यामुळे अनेक भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काहींना दर्शन न घेता परतावेही लागले होते.

भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या व्यवस्थेनुसार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत कोणतीही ऑनलाइन नोंदणी किंवा पास न घेता भाविकांना थेट मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्यात दर्शन घेता येणार आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मंदिरातील मुख्य सभामंडपाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे दुपारनंतर सुरू ठेवली जाणार आहेत. त्यामुळे सकाळची वेळ भाविकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या कालावधीत दर्शन सुरळीत पार पडणार असून त्यानंतर विकासकामे सुरू राहतील.
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या काळात देशभरातून लाखो शिवभक्त भीमाशंकर येथे दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आता ऑनलाइन पास मिळविण्याची धावपळ किंवा नोंदणीची अडचण न येता शिवभक्तांना थेट भीमाशंकर मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे आगामी काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






