लोणी काळभोर, ता. १० : हांडेवाडी परिसरात विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या अज्ञात रिक्षामुळे दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. 8 ) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, अपघात घडवून संबंधित रिक्षाचालकाने जखमींची कोणतीही विचारपूस न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी देवाची येथील यशराज पार्क सोसायटीमध्ये राहणारे शिवराज बालाजी पांचाळ (वय ३८) हे उंड्री-पिसोळी परिसरातील एका फर्निचर कंपनीत नोकरी करतात. ते पत्नी सुमित्रा यांच्यासह त्यांच्या होंडा युनिकॉर्न (एमएच-१२ एचपी-६५८६) या दुचाकीवरून पिसोळीच्या दिशेने जात होते.

हांडेवाडी येथील समृद्धी हॉटेलसमोर पोहोचताच विरुद्ध दिशेने अचानक आलेल्या एका अज्ञात रिक्षाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात शिवराज पांचाळ यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाला दुखापत झाली, तर दुचाकीच्या पुढील भागाचे नुकसान होऊन हेडलाईट तुटले.
जखमी शिवराज पांचाळ यांना त्यांच्या पत्नीने तातडीने हांडेवाडी येथील ऑनिस्केअर रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, अपघात घडवून संबंधित रिक्षाचालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवून अपघात घडवल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. राँग साईडने वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.







