दौंड, (पुणे) : दौंड शहर आणि परिसरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्हा व पुणे पोलीस आयुक्तालयासह तब्बल चार जिल्ह्यांच्या हद्दीतून पुढील एक वर्षासाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे.

अमोल शंकर विटकर (रा. बोरावकेनगर, ता. दौंड) व असीम कासिम उर्फ असिफ कासम कुरेशी (रा. खाटीक गल्ली, दौंड) अशी सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. दोन्ही गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालय व महानगरपालिका हद्दीसह पुणे, सोलापूर, सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यांच्या हद्दीतून पुढील एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल विटकर हा आरोपी सराईत असून त्याच्याविरुद्ध शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. लोकांमध्ये भीती व दहशत निर्माण करणे, नागरिकांना दमदाटी करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे, तसेच मानवी जीवितास धोका निर्माण करण्याचे अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. दौंड पोलीस ठाण्यात सन 2023 ते 2025 या कालावधीत त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत.
दुसरा असीम कुरेशी या आरोपीविरुद्ध देखील शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. तसेच गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीर कत्तल करणे, गोवंश जनावरे कत्तलीच्या उद्देशाने क्रूरपणे डांबून ठेवणे आणि सण-उत्सवाच्या काळात नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावून कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे गंभीर गुन्हे याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेले आहेत.
या दोन्ही आरोपींच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे दौंड परिसरात सर्वसामान्य जनता आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. वारंवार समजावूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने, दौंड पोलिसांनी या दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 (1) (अ) व (ब) अन्वये तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी दौंड यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावावर दोन्ही बाजूंची सुनावणी झाल्यानंतर, उपविभागीय दंडाधिकारी रेवनाथ लबडे यांनी दोन्ही गुन्हेगारांच्या गुन्हेगारीची गंभीर दखल घेतली. त्यांनी अमोल विटकर आणि असिफ कुरेशी या दोघांना 1 वर्षासाठी पुणे पोलीस आयुक्तालय व महानगरपालिका हद्दीसह पुणे, सोलापूर, सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यांच्या हद्दीतून तडीपार करण्याचे आदेश जारी केले.
दरम्यान, सदर तडीपार आदेशाची दोन्ही आरोपींना विधिवत बजावणी करण्यात आली असून त्यांना संबंधित जिल्ह्यांच्या हद्दीबाहेर रवाना करण्याची कार्यवाही देखील पूर्ण करण्यात आली आहे.







