बारामती: बारामतीतील जळोची परिसरातील शेतात प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवून ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा गांजा जप्त केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या आंतरराज्यीय गांजा पुरवठा साखळीचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय असलेल्या विकी विजय कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ४७८.९५० किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत २ कोटी ३९ लाख ४९ हजार रुपये आहे. या प्रकरणाचे धागेदोरे ओडिशापर्यंत पोहोचले आहेत.

पिंपळी रोड परिसरातील एका शेतात मोठ्या प्रमाणात गांजा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शेतात छापा टाकला. तेथे ‘समृद्धी ॲक्वा’ कंपनीचे १५०० लिटर क्षमतेचे दोन प्लास्टिक ड्रम आढळून आले. ड्रमची तपासणी केली असता त्यामध्ये ४६५ पॅकेट्समध्ये गांजा भरून ठेवण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी हा संपूर्ण साठा जप्त केला.

गांजाचा एवढा मोठा साठा नेमका कोणाचा आहे आणि त्यामागे कोणाचे नेटवर्क आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली. सीडीआर, डम्प डेटा, मोबाइल लोकेशन, आयएमईआय मॅपिंग आणि सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करण्यात आले. या तपासातून पोलिसांना विकी कांबळे याच्यापर्यंत पोहोचण्यात यश आले.

पोलिसांनी विकी कांबळे याला २ सप्टेंबर रोजी रात्री ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत त्याच्याकडून गांजा पुरवठ्याचे नेटवर्क, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित व्यक्तींची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
विकी कांबळे याच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाची कारवाई सांगली येथे झाल्याचे तपासात समोर आले आहे. तेथे त्याच्याकडून १३४ किलो गांजा आणि इनोव्हा कार असा एकूण ४२ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
बारामती आणि सांगलीतील या दोन्ही कारवायांमुळे आतापर्यंत तब्बल ६३५.९६० किलो गांजाचा साठा उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांजा तस्करीचे जाळे किती मोठे आहे, याचा अंदाज येत आहे.
पोलिसांच्या तपासात प्रकाश उर्फ पक्या काटे, समाधान गायकवाड, प्रिन्सकुमार मुन्ना सिंग, राहुल गोरे, संग्राम उर्फ चंदन सिंग आणि ओडिशातील जॉकी माझी यांची नावे समोर आली आहेत. या सर्वांची या नेटवर्कमध्ये नेमकी भूमिका काय होती, याचा तपास सुरू आहे.
प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. विकी कांबळेच्या पोलीस कोठडीदरम्यान गांजाचा पुरवठा कुठून होत होता, त्याची वाहतूक कोण करत होते, या व्यवहारामागे कोणाचे आर्थिक पाठबळ होते आणि या आंतरराज्यीय रॅकेटमागील प्रमुख सूत्रधार कोण आहेत, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.







