गुवाहाटी: आसाममधील गुवाहाटी शहरातून एक अत्यंत धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. हाटीगाव परिसरातील एका फ्लॅटमध्ये 25 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात तिच्या पतीवर हत्येचा संशय असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

रिया तालुकदार असे मृत महिलेचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा रामानुज गोस्वामी याच्यासोबत विवाह झाला होता. दोघे हाटीगाव पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. घटनेच्या दिवशी पती-पत्नीमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

या घटनेचा प्रकार तेव्हा उघडकीस आला, जेव्हा अपार्टमेंटमधील नागरिकांना संबंधित घरातून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्याचबरोबर हे दाम्पत्य मागील दोन दिवसांपासून परिसरात दिसत नव्हते. त्यांचे मोबाईलही बंद असल्याने रहिवाशांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराची तपासणी केली. त्यावेळी रियाचा मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था पाहता हत्येला काही काळ लोटल्याचे प्राथमिक तपासातून दिसून आले. तिच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.
तपासादरम्यान पोलिसांनी घरातील फ्रिजची पाहणी केली. त्यात प्लास्टिकच्या पिशवीमध्ये रियाचे शीर ठेवलेले तसेच हाताची बोटं गायब होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
रिया फॅन्सी बाजारमधील एसी मार्केट परिसरातील एका बुटीकमध्ये नोकरी करत होती. तिचे आई-वडील हयात नसून कुटुंबात तिचा एक भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणातील संशयित पतीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, घटनेच्या वेळी काय घडले आणि या प्रकरणामागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.







