पुणे : वानवडी परिसरात रविवारी पहाटे श्वानाला फिरवून घरी परतणाऱ्या ३६ वर्षीय व्यक्तीवर चार जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. रस्त्यालगत संशयास्पदरित्या बसलेल्या काही जणांना हटकण्यावरून झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात राहुल बाळकृष्ण गव्हाणे (वय ३६, रा. वानवडी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत.

वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंडित रजितवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गव्हाणे रविवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास श्वानाला फिरवून घरी जात होते. त्यावेळी नोबेल बेकरी परिसरातील रस्त्यालगतच्या पार्किंगमध्ये तीन ते चार जण अंधारात बसलेले त्यांना दिसले. गव्हाणे यांनी त्यांना पहाटेच्या वेळी येथे काय करत आहात, अशी विचारणा केली. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली.

वाद वाढल्यानंतर संबंधित टोळक्यातील व्यक्तींनी गव्हाणे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्यानंतर तेथून पसार झाले. या हल्ल्यात गव्हाणे यांच्या हाताला आणि मानेजवळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना संशयित आरोपींच्या वाहनाचा क्रमांक मिळाला असून त्यावरून आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.






