विशाल शिंदे

भोर : सातारा-पुणे महामार्गालगत शिंदेवाडी पुलाखालील सर्व्हिस रोडवर भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील संस्कृती राजू पिसे (वय २१, रा. कोकणनगर, ता. जि. रत्नागिरी) हिचा मृत्यू झाला असून प्रतिक राजेंद्र ओतारी (वय २७, रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) व ऋतिक हे दोघे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी प्रतिक राजेंद्र ओतारी यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रकचालक करमहुसेन गयासुदिदन चौधरी (रा. आमगाव, तहसील नौगड, जि. नौगड, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रतिक ओतारी, ऋतिक आणि संस्कृती हे तिघे ऋतिकच्या दुचाकीवरून शिंदेवाडी गावच्या हद्दीत सातारा-पुणे महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडने प्रवास करीत होते. त्यावेळी आरोपी चालक चौधरी हा त्याच्या ताब्यातील ट्रक साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने चालवत होता.
आरोपी चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून ट्रक भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. शिंदेवाडी पुलाखाली ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी काही अंतरापर्यंत ट्रकसोबत ओढली गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या अपघातात दुचाकीवरील संस्कृती राजू पिसे हिला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. तसेच प्रतिक ओतारी व ऋतिक हे दोघेही जखमी झाले. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळी ट्रक सोडून तेथून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर राजगड पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अपघाताची नेमकी परिस्थिती, चालकाचा निष्काळजीपणा आणि अपघातास कारणीभूत ठरलेल्या बाबींचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.







