पुणे: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा गावात महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त विशेष सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आले. हवेली पंचायत समितीच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान ‘अजित वनराई’ या महत्त्वाच्या उपक्रमांतर्गत गावात तब्बल 500 नारळाच्या रोपांची लागवड करण्यात आली. तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्रतिमेचे पूजन करून ‘अजितवृक्ष’ लावत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके यांच्या हस्ते करण्यात आले, तर सुरेशराव घुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती हवेलीचे सभापतीयुवराज हिरामण काकडे, उपसभापती विद्या दत्तात्रय गायकवाड, गटविकास अधिकारी शेखरजी शेलार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप वाल्हेकर, जि.प.सदस्य कोमलताई संदेश आव्हाळे, सुरेखाताई रमेशबापू हरगुडे, शितलताई सुजित कांबळे, पं.स.सदस्य कृषिराज दत्तात्रय चौधरी, कोमलताई गणेश कांबळे, सुषमाताई संतोष मुरकुटे, नंदू पाटील काळभोर, गुलाब चौधरी, दिलीप गाडे यांच्यासह पंचायत समिती हवेलीचे अधिकारी-पदाधिकारी, राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, आळंदीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच श्री म्हातोबा जोगेश्वरी कृती समितीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या दूरगामी व विकासाभिमुख कामांच्या आठवणींना उजाळा दिला. दादांच्या स्मृती जपण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले. भविष्यात संपूर्ण हवेली तालुका हिरवागार आणि सुंदर बनवण्याचा दृढ संकल्प यावेळी करण्यात आला. या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे संपूर्ण तालुक्यात एक चांगला संदेश गेल्याचे सभापती युवराज काकडे यांनी सांगितले.








