पुणे: पुण्यातील वानवडी परिसरातून सुरक्षेचा बोजवारा उडवणारी एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अत्यंत सुरक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एका सोसायटीत मध्यरात्रीच्या सुमारास तीन अज्ञात चोरांनी धुमाकूळ घालत तब्बल 2715000 रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. या धाडसी चोरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे.

ही थरारक घटना २१ जुलै रोजी पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान घडली. आपली ओळख पूर्णपणे लपवण्यासाठी या चोरट्यांनी डोक्यावर हुडी, तोंडाला मास्क आणि हाताचे ठसे मागे पडू नयेत म्हणून हाताभोवती रुमाल बांधले होते. संपूर्ण परिसरात शांतता असताना त्यांनी मनेश शांतिलाल शहा (वय 65) यांच्या फ्लॅटला आपले टार्गेट केले. घरात शिरल्यानंतर या भामट्यांनी थेट बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडले. कपाटात ठेवलेले सुमारे 197 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 1315000 रुपयांची रोकड असा एकूण 2715000 रुपयांचा ऐवज चोरांनी एकाच झटक्यात पळवून नेला.

सकाळी हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर मनेश शहा यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकारची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून वानवडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.







