राहुलकुमार अवचट
यवत : दौंड येथे मतदान अधिकाऱ्यांना निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. बारामती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत दौंड विधानसभा मतदार संघात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमणुक केलेल्या क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी यांना निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले. २५ आणि २६ एप्रिल रोजी दौंड राज्य राखीव पोलीस बल गट ५ येथील मंगलमुर्ती सभागृह या ठिकाणी दोन सत्रात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
दौंड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मतदान साहित्य स्विकृती करताना मिळालेल्या साहित्याची तपासणी केली. तसेच मॉक पोल व विविध प्रकारचे फॉर्म तसेच मतदानादिवशी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी १.२. ३ यांनी मतदान केंद्रावर करावयाच्या कामाची माहिती दिली.
तहसिलदार अरुण शेलार यांनी EVM मशिन कसे हताळावे याबाबत माहिती दिली. तसेच मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मशिन पुन्हा सेट करणेबाबत PPT व्दारे माहिती दिली. सदर कर्मचारी यांना व्दितीय सत्रात संत तुकडोजी विद्यालय दौंड येथे प्रत्यक्ष EVM मशिन जोडणी, मॉक घेणेबाबतचे प्रत्याक्षिक, मशिन क्लिअर करणे, मतदानासाठी मशिन तयार करणे याबाबत मास्टर ट्रेनर्स यांचे साह्याने प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले.
तसेच पोस्टल बैलेटबाबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी कर्मचाऱ्यांना माहिती दिली. सदरचे प्रशिक्षण पार पाडणेसाठी नायब तहसिलदार शरद भोंग, तालुका कृषी अधिकारी राहुल माने, तलाठी फरांदे यांचेसह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.