यवत, ता. २० : बारामती एमआयडीसीतील वाहन उत्पादन कंपनीत टेस्टिंगचे काम करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाचा रोटी घाटात टेस्ट ड्राइव्हदरम्यान झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

निखील नंदकुमार फडतरे (वय २३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नंदकुमार लालासो फडतरे (वय ४८, रा. घाडगेवाडी, ता. बारामती) यांनी पाटस पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , निखील नंदकुमार फडतरे (वय २३) हा बारामती एमआयडीसीतील पेंजो (Peugeot) कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून वाहन टेस्टिंगचे काम करत होता.

निखील फडतरे हा २१ मे २०२६ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. दुपारी सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास रोटी घाट परिसरात अँप्रिला आरएस ४५७ या नवीन मॉडेलच्या दुचाकीची टेस्ट ड्राइव्ह करत असताना त्याच्या वाहनावरील ताबा सुटला. मोटारसायकल रस्त्यावर घसरून झालेल्या अपघातात निखील गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर त्याला तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. नातेवाईकांकडून अंत्यसंस्कार व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी पाटस पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली. यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे फडतरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.







