पुणे: पुणे जिल्ह्यातील मंचर येथे एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाढदिवस साजरा करून अवघा एक दिवस उलटत नाही तोच या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

या अपघातात वीर अनिल शिंदे (वय 17) यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे रविवारीच त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. दुसऱ्याच दिवशी झालेल्या या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वीर आपल्या दोन मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील महात्मा गांधी विद्यालयासमोर त्यांच्या दुचाकीची एसटी बसशी जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की वीर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत साहिल संदीप टेमकर (वय 17) आणि तेजस महेश भालेराव (वय 17) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मंचर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. तरीही या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने धावतात आणि त्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या भागात तातडीने स्पीडब्रेकर बसवावेत आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलीस करत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.







