उरुळी कांचन : पुणे – सोलापूर महामार्गारील उरुळी कांचन येथील तळवाडी चौकातील वाहतूक कोंडी हि आता नित्याचीच बनलेली आहे. या ठिकाणी असणारे वाहतूक नियमन करण्यासाठी असणारे पोलीस म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा अशी परिस्थिती पाहायला मिळत आहेत. पोलीस प्रशासनाचा वाहतूक विभाग यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
उरुळी कांचन येथील तळवाडी चौक चक्क वाहनतळ झाले आहेत. येथून शाळा महाविद्यालयात, कामावर जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथे भाजीबाजारासह बाजारपेठही आहे; परंतु हे चौक वाहतूक नियमनात नापास झाल्याने मुख्य रस्त्यावर असलेली वाहनांची पार्किंग, बेशिस्त वाहतूक, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष अशा कारणांनी वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे.
रस्त्यावर दुतर्फा झालेले अतिक्रमण असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच नाईलाजाने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. उभ्या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होणार नाही याची जबाबदारी वाहतूक शाखेचीच असताना, हे कर्तव्य पोलीस विसरून फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत का? असा आरोप नागरीक करू लागले आहेत.
महामार्गावर ठिकठिकाणी अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जातात. दुतर्फा उभ्या असलेल्या फेरीवाल्यांच्या हातगाड्या अवजड वाहने, बेशिस्त चालक, वाहतूक पोलीसांची उदासीनता यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासन कोणत्याही उपाययोजनांचा अवलंब करत नसल्याने लहान मोठ्या अपघातात वाढ झाली आहे. अशा वाहनांवर कधी कारवाई होणार, असा सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, सोलापूर, लातूर, दौंड, पुरंदर व शिरूर परिसरातून खासगी जीप, ऑटो आदी वाहनांमधून मेंढरासारखे प्रवाशी कोंबून बेकायदेशीरपणे सोलापूर महामार्गावर धावतांना दिसून येतात. वाहन अचानक रस्त्यात थांबवून प्रवाशी घेणे, एका तर्फावरून (लेनवरून) दुसऱ्या तर्फावर घेणे आदी प्रकारांमुळे मागून येणाऱ्या वाहन चालकांना मोठा धोका पत्करावा लागत आहे.
बेशिस्त वाहनचालक जोमात, वाहतूक कोमात..
उरुळी कांचन व परिसराचा विस्तार दिवसागणिक वाढत चालला आहे. या ठिकाणी कायमच नागरिक अन् वाहतुकीच्या वर्दळ सुरू असते. या रस्त्यातून नागरिकांना मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. त्यात काही बेशिस्त नागरिक चारचाकी वाहन वाटेल त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी निर्माण होत असते.
याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर एक व्यावसायिक म्हणाले, ” उरुळी कांचन येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. जाताना व येताना या ठिकाणी वाहतूक पोलीस काम करतात. मात्र, त्याच्याच बाजूला मोठ्या प्रमाणावर यवतच्या बाजूला जाणाऱ्या व पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरच दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहने थांबलेली असतात. मात्र, वाहतूक शाखेचे पोलीस मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करावी.