अमोल दरेकर
सणसवाडी : पुणे जिल्ह्यातील शिरूर, खेड आणि मावळ या तीन तालुक्याला जोडणारा रस्ता अशी ओळख तर आहेच. पण, पुणे-नाशिक, पुणे-मुंबई, आणि पुणे-नागपूर अशा अनेक महामार्गाना जोडणारा रस्ता अशी देखील या रस्त्याची ओळख आहे. या रस्त्याने अनेक शहरातील लोक, शेतीमाल, अनेक पंचतारांकित औद्योगिक वसाहतील माल आणि कामगार प्रवास करत असतात. यामुळे मालवाहतूक करणाऱ्या आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अरुंद रस्ता, रस्त्याची वाताहत यामुळे पोलीस प्रशासन यंत्रणेवर ताण येत आहे. या रस्त्यावर अनेक वेळा केंद्र आणि राज्य सरकारने घोषणा केल्या, मात्र कोणतीही अंमलबजावणी झाली नसल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. या गोष्टीकडे प्रशासन डोळे झाकून का बसले आहे? तसेच रस्त्याची दुरावस्था यामुळे नागरिकांचे नाहक जीव जात आहेत. अजून किती लोकांचे बळी घेतल्यानंतर प्रशासन जागं होणार? असा प्रश्न नागरिकाकडून सतत केला जात आहे.
या रस्त्यावरील वाहतूक कोंडी नित्याची झाल्याने येथील औद्योगिक वसाहतील मालक आणि कामगार त्रस्त झाले आहेत. अनेक कंपन्या व्यवस्थापन वेगवेगळ्या राज्यात स्थलांतर करण्याच्या भूमिकेत असल्याचे बोललं जात आहे. यामुळे येथील कामगारांचे भवितव्य अधांतरी आणि राज्य सरकारचा कर बुडण्याची भीती येथील स्थानिक संस्थांना वाटतं आहे. यावर वेळीच तोडगा काढण्याची अनेक संघटनेच्या माध्यमातून मागणी केली जात आहे.