राहुलकुमार अवचट

यवत, (पुणे) : दौंड तालुक्यातील पाटस गावच्या हद्दीत सिमेंट भरण्याच्या कारणावरून जुना वाद मिटवण्यासाठी जमलेल्या दोन गटांमध्ये अचानक वाद विकोपाला गेला. यात एका गटाने थेट गावठी कट्ट्यातून गोळीबार केला, तर दुसऱ्या गटाने बेकायदेशीर जमाव जमवून लोखंडी गजांनी व दगडांनी समोरच्यांच्या डोक्यात प्रहार करत जीवघेणा हल्ला चढवला. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी एकूण 9 जणांना ताब्यात घेतले.

पहिल्या घटनेत संतोष बाळकृष्ण कडू, वय 41 वर्षे, व्यवसाय ट्रक चालक, रा. बेटवाडी, ता. दौंड, जि. पुणे. यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा आणि आरोपी सूरज कुऱ्हाडकर यांच्यात ‘श्री सिमेंट कंपनी, पाटस’ येथे ट्रक लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी 5 जून 2026 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते पाटस येथील गरदडे कॉम्प्लेक्स समोर चर्चेसाठी बसले होते.
चर्चा सुरू असतानाच आरोपी सूरज कुऱ्हाडकरने त्याचे साथीदार अजय धोत्रे, श्रीकांत पवार आणि अनिल चव्हाण यांना तिथे बोलावून घेतले. त्यांनी कडू यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याच दरम्यान, आरोपी अजय धोत्रे याने कमरेचा गावठी कट्टा काढून संतोष कडू यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने थेट गोळीबार केला. कडू यांनी प्रसंगावधान राखल्याने ते यातून सुखरूप बचावले. याप्रकरणी पोलिसांनी सूरज राजेंद्र कुऱ्हाडकर,अजय धोत्रे, अनिल चव्हाण (सर्व रा. अंबिकानगर, पाटस) आणि इतर 3 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत ट्रक चालक सूरज राजेंद्र कुऱ्हाडकर (वय 32, रा. अंबिकानगर, पाटस) यांनी कडू गटाविरुद्ध परस्परविरोधी खुनाचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिली. कुऱ्हाडकर यांच्या तक्रारीनुसार, चर्चा सुरू असतानाच आरोपी संतोष कडू आणि त्याच्या साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून हातात लोखंडी गज आणि दगड घेऊन हल्ला चढवला.
समोरच्या आरोपींना कृत्य केल्यास जीव जाईल हे पूर्णपणे माहीत असतानाही, त्यांनी लोखंडी गजाने आणि दगडांनी सूरज कुऱ्हाडकर तसेच त्यांच्या साक्षीदारांच्या डोक्यावर गंभीर प्रहार केले. या जीवघेण्या हल्ल्यात कुऱ्हाडकर यांच्या गटातील लोक रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी पोलिसांनी संतोष बाळकृष्ण कडू (रा. बेटवाडी, दौंड), अण्णा बाबू गायकवाड, रावसाहेब गंगाराम पालवे, सुधीर अण्णा फुलमाळी, रामा बाजीराव गायकवाड, अनिल रामा गायकवाड (सर्व रा. जोशी वस्ती, ढोकराई फाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि इतर 4 ते 5 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही बाजूच्या फिर्यादीवरून सुमारे 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यवत चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय कोल्हे हे करीत आहेत.







