मुंबई: गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये महिला प्रवाशाशी गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित बस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एक महिला गोव्यातील सुट्टी आटोपून एमएच-43-सीके-2981 क्रमांकाच्या राजधानी ट्रॅव्हल्सच्या बसने मुंबईकडे प्रवास करत होती. प्रवासादरम्यान बसमधील एका कर्मचाऱ्याने तिच्याशी वारंवार गैरवर्तन केल्याचा आरोप महिलेने केला आहे. रात्रीच्या वेळी हा प्रकार घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने धाडस दाखवत 112 या आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधून पोलिसांकडे मदत मागितली.

तक्रार मिळाल्यानंतर रायगड पोलिसांनी तातडीने हालचाल करत कोलाड परिसरात बस अडवली. त्यानंतर महिलेची सविस्तर माहिती घेऊन बसला कोलाड पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महिलेच्या तक्रारीच्या आधारे आरोपी होशियार डिगर सिंग कार्की, रा. उत्तराखंड, याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 74 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये महिला प्रवाशांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेवर राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड होऊ नये आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कोलाड पोलीस करत असून, बसमधील इतर कर्मचारी आणि प्रवाशांचे जबाब तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जात आहे.






