पुणे, ता. ६ : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने धाड टाकून तीन अल्पवयीन मुलींसह काही महिलांची सुटका केली. या प्रकरणी मुंबईतील माहिम परिसरातील ३४ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याविरुद्ध पोक्सो कायद्यासह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारजे येथील साई एक्झिकेटिव्ह लॉजिंग अँड बोर्डिंग येथे महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीची खातरजमा करण्यात आली.

पडताळणीनंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. ठरलेल्या इशाऱ्यानंतर पथकाने लॉजवर अचानक छापा टाकला. या कारवाईत तीन अल्पवयीन मुलींसह काही महिलांची सुटका करण्यात आली, तर या व्यवसायाचे व्यवस्थापन करणाऱ्या ३४ वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा तसेच अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गोहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, बबनराव केदार, दत्ताराम जाधव, किशोर भुजबळ, अविनाश कोंडे, वैशाली खेडेकर आणि वैशाली इंगळे यांच्या पथकाने केली.







