वाघोली, ता. १९ : वाघोली (ता. हवेली) परिसरात दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना घडली आहे. बँकेतून काढलेले तब्बल सहा लाख रुपये कारच्या डॅशबोर्डमध्ये ठेवून कार्यालयात गेलेल्या अकाउंटंटची रक्कम अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून गुरुवारी (ता. १८) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास लंपास केली. अवघ्या दहा मिनिटांत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी बशीर सुलेमान शेख (वय ३८, रा. केसनंद, ता. हवेली) यांनी वाघोली पोलिसांकडे फिर्याद दिली असून, दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बशीर शेख हे व्ही. अॅण्ड जे. डेव्हलपर्स या कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या वाघोली शाखेतून कंपनीच्या खात्यातील सहा लाख रुपयांची रक्कम काढली. ही रक्कम प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून त्यांनी त्यांच्या सॅन्ट्रो कारच्या डॅशबोर्डमध्ये ठेवली.

त्यानंतर ते गट क्रमांक ५६६, गगन अदीरा सोसायटीसमोरील कार्यालयात गेले. अवघ्या दहा मिनिटांनंतर ते परत कारजवळ आले असता कारच्या मागील डाव्या बाजूची काच फोडलेली दिसली. डॅशबोर्ड तपासला असता त्यामध्ये ठेवलेली सहा लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या घटनेनंतर शेख आणि कार्यालयातील सहकारी अभिजित शेंडे व अभिजित भोसले यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एका दुचाकीवर आलेले दोन संशयित इसम कारजवळ येऊन काच फोडत रोख रक्कम घेऊन पसार होत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
दरम्यान, संशयितांपैकी एकाने पांढऱ्या रंगाचा शर्ट तर दुसऱ्याने मेहंदी रंगाचा शर्ट परिधान केला होता. दोघांचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वाघोली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, दोन्ही संशयितांचा शोध सुरू केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी चोरीमुळे वाघोली परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.







