पुणे : बालेवाडी परिसरातील सनशाईन पार्क सोसायटीमध्ये मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चार सशस्त्र चोरट्यांमुळे रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. 3 ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे 2:30 वाजता ही घटना घडली. चोरट्यांनी काही फ्लॅटच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावल्या आणि त्यानंतर घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

या प्रकाराची चाहूल लागताच सोसायटीतील रहिवासी आणि सुरक्षारक्षक सतर्क झाले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी येत असल्याचे समजताच चारही आरोपींनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापैकी एक आरोपी सोसायटीच्या टेरेसवर जाऊन लपला.

पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवत टेरेसवर लपलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव रामकिशोर विनोदकुमार दाबला (वय 26, रा. जे जे कॉलनी, बक्करवाला, दिल्ली) असे आहे. या कारवाईची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार, चारही जण लोखंडी हत्यारे घेऊन सोसायटीत दाखल झाले होते. त्यांनी आधी काही घरांच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावल्या. रहिवासी झोपेत असताना घरफोडी करून मौल्यवान वस्तू चोरण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील इतर 3 आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेप्रकरणी सोसायटीतील रहिवासी गजानन प्रकाश शेटे (वय 51) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरु आहे.







