पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ठाणे गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू असून, हत्येच्या वेळी घटनास्थळी पाच जण उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. आता फरार आरोपींपैकी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याचे लोकेशन शोधण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांपैकी तीन आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत बेड्या ठोकल्या आहेत. घटना घडून सात दिवस उलटले तरी टल्ली आणि त्याचा आणखी एक साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस अटकेपासून वाचण्यासाठी टल्ली सतत आपले ठिकाण बदलत असून तो दुसऱ्या राज्यात पळून गेल्याचा संशय आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

तपासादरम्यान अटक करण्यात आलेला आरोपी पप्या शिंदे याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पप्या शिंदे याने तपासात पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असला, तरी आरोपींना गोव्याला पळून जाण्यासाठी कारची सोय त्यानेच केल्याचे उघड झाले आहे. याशिवाय, त्याने इतर आरोपींशी तब्बल 150 वेळा संपर्क साधल्याची माहिती समोर आली असून, हा संपूर्ण कट अनेक दिवसांपासून रचला जात होता.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी पूर्णेकर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या प्रकरणात पूर्णेकर कुटुंबीयांच्या जबावावरून शिंदे गटाच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, मिनाक्षी शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याविरोधात कोणतीही पुरावे नसताना राजकीय द्वेषातून नावे गोवली जात असल्याचे सांगत, आधी दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करा, मगच माझ्यावर आरोप करा, असा घणाघाती पलटवार त्यांनी केला आहे.






