उरुळी कांचन (पुणे) : मुळा-मुठा नदीला पूर आल्याने नदीच्या काठावर ठेवलेल्या 3 शेतकऱ्यांच्या तब्बल 50 हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रीक मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत दशरथ बाबुराव यादव (वय 67,रा. कोरेगाव मुळ ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दशरथ बाबुराव यादव यांची लुबी कंपनीची 20 हजार रुपये किमतीची 12.5 एच.पी हावर्स पावरची विद्युत मोटार, रोहीत तुकाराम निकम यांची टेक्समो कंपनीची 20 हजार रुपये किमतीची 15 एच.पी हॉर्स पावरची विद्युत मोटार, व शुभम बाळासाहेब भंडारे यांची टेक्समो कंपनीची 10 हजार रुपये किमतीची एच.पी हार्स पावरची विद्युत मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. त्यानुसार यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ यादव हे शेतकरी असून मुळा-मुठा नदीवरून पाईपलाईन करून शेतीसाठी पाणी आणले आहे. त्यासाठी नदीलगत गावठाणामध्ये 12.5 एच.पी ची पाण्याची इलेक्ट्रीक मोटार बसविलेली आहे. यंदा व मागच्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुळा-मुठा नदीला पूर आला होता. यावेळी यादव व आजुबाजुचे शेतकऱ्यांनी नदीमध्ये असलेल्या मोटारी पाण्याबाहेर नदीलगत काढुन ठेवल्या होत्या.
दशरथ यादव व जालिंदर भोईटे नदीकिनारी मोटार पाहण्यासाठी गेले असता मोटारीनदीकाठी दिसुन आले नाहीत. यावेळी आजुबाजूस मोटारी असलेल्या लोकांकडे चौकशी केली. यावेळी रोहीत तुकाराम निकम, शुभम बाळासाहेब भंडारे यांच्या इलेक्ट्रीक मोटारी नसल्याची माहिती मिळाली.
यावेळी रोहीत निकम, शुभम भंडारे यांनी मोटारीचा नदीलगत तसेच कोरेगाव मुळ गावात व परिसरात शोध घेतला असता त्या मिळुन आल्या नाहीत. यावरून मुळा मुठा नदीकाठी ठेवलेल्या इलेक्ट्रीक मोटारी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे लक्षात आले. यावरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शेतकरी नैसर्गिक व आर्थिक संकटात सापडला असताना अशा प्रकारच्या चोऱ्या करणाऱ्यांचा शोध लावून कडक कारवाई करण्याची मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी केली आहे. विद्युत मोटार चोरी करणाऱ्या टोळ्यांचा शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला असून शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.