लोणी काळभोर (पुणे) : कायम वर्दळ असलेल्या सासवड – हडपसर मार्गावरील दिवे घाटात अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकीस्वारांना मारहाण केली आहे. मारहाण करुन त्यांच्याकडील किमती मोबाईल पळवून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. रविवारी (ता. 21) मध्यरात्री दोन व अडीच वाजण्याच्या सुमारास या दोन घटना घडल्या आहेत.
अमित गुप्ता व अभिषेक गुप्ता अशी मारहाण करून मोबाईल चोरून नेलेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. याप्रकरणी दोघांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांचा विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित गुप्ता हे सासवड बाजूकडून ते राहत असलेल्या हडपसर परिसराकडे दुचाकीवरून येत होते. यावेळी दोन वाजण्याच्या सुमारास दिवे घाटात अज्ञात चोरट्यांनी थांबवून जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या जवळ असलेला १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून घेऊन गेला आहे.
दुसऱ्या घटनेत रविवारी मध्यरात्री अभिषेक गुप्ता हे त्याच ठिकाणावरून जेजुरी येथे दर्शनासाठी गेले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास हडपसरकडे येत होते. घाटातील वळणावर चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांना धमकावून त्यांच्याजवळ असलेले २३ हजार रुपये किमतीचे मोबाईल संच चोरले. यावेळी चोरटे हे त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकीवरून फरार झाले. तपास पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.