लोणी काळभोर: अष्टविनायकापैकी एक (Theur News) प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथील (Pune News) चिंतामणी मंदिर हे ऐतिहासिक आणि पौराणिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते. या मंदिराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अखंडता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे संरक्षण करणे, जतन करणे आणि जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे. त्यामुळे या मंदिराच्या विकासासाठी पुरातत्त्व विभागाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. विलास वहाणे यांनी दिली आहे.

थेऊर येथे मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामाचा शुभारंभ डॉ. विलास वहाणे यांच्याहस्ते नुकताच पार पडला. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी आर्किटेक्ट अंजली कलमदानी, थेऊरचे उपसरपंच भाऊसाहेब काळे, सदस्य संतोष काकडे, आबा काळे, पुजारी राहुल आगलावे, महेश आगलावे, विश्वस्त केशव विद्वांस, देवराज डहाळे, जितेंद्र देव आदी मान्यवर उपस्थित होते.
या निधीच्या माध्यमातून थेऊर मंदिर परिसरात विविध विकासकामे होणार आहेत. मंदिरात दगडी फरशी, लाकडी सभामंडप नूतनीकरण, दीपमाळ, दर्शन व्यवस्था, विद्युतीकरण, इतर सुविधा, दुरुस्त्या अशा कामांचा समावेश असणार आहे.







