पुणे : राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीबाबत शरद पवार यांचे विश्वासू सहकारी समजले जाणारे आणि सध्या अजित पवार यांच्यासोबत असणारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. बऱ्याचजणांना आतल्या गोष्टी माहित नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले दिलीप वळसे पाटील..
आंबेगावमधील कळंब येथे बोलत असताना दिलीप वळसे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, काही लोकं विचारतात की तुम्ही पवार साहेबांना का सोडलं, पवार साहेबांना सोडायचा प्रश्नच येत नाही. बऱ्याच लोकांना बऱ्याच आतल्या गोष्टी माहीत नसतात असे त्यांनी म्हटले. वळसे पाटील पुढे म्हणाले की, पक्षाच्या 54 आमदारांची बैठक बोलावली आणि त्यात सरकारमध्ये जाण्याची चर्चा झाली. आपण सरकारमध्ये जायचं ठरलं, दुसऱ्या पक्षात नाही. आपण कोणत्या पक्षात गेलो नाही, आपला पक्ष राष्ट्रवादी व चिन्ह घड्याळच असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
दिलीप वळसे पाटील यांनी पुढे म्हटले की, रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचं होतं. गेल्या दोन वर्षांत अजितदादा अर्थमंत्री असल्याने त्यांनी भरभरून पैसा दिला आणि आपली कामे झाली. राजकरणात अशा गोष्टी कधी कधी घडतात. एकदा आपण पुलोद स्थापन केला, एकदा काँगेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. तसं आज राजकरणात काही बदल झाला तर हा बदल परिस्थितीप्रमाणे हाताळायचा असतो असही वळसे पाटील म्हणाले.
याचा अर्थ लगेच आपण शरद पवार साहेबांचे शत्रू झालो..
दिलीप वळसे पाटील यांनी पुढे म्हणाले की, याचा अर्थ लगेच आपण शरद पवार साहेबांचे शत्रू झालो, आणि ते आपले शत्रू झाले असं नाही. त्यांच्या बाबत प्रेम व आदर आजही आपल्यात आहे. पण विरोधकांकडे मुद्दे नाहीत, काही भांडवल नाही, बोलायला मुद्दे नाहीत म्हणून हे भावनिक मुद्दे मांडले जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.