उरुळी कांचन : राहत्या घराच्या बाजूला पार्क केलेली 1 लाख 70 हजार रुपये किमतीची स्विफ्ट ग्रे रंगाची कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महात्मा गांधी विद्यालयाच्या शेजारी गुरुवारी (ता. 02) मध्यरात्री हि घटना घडली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहसीन दिलावर अत्तार (वय-४२ वर्षे व्यवसाय-नोकरी रा. महात्मा गांधी विदयालय शेजारी उरुळी कांचन ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांनी उरुळी कांचन पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन अत्तार हे कुटूंबासोबत राहणेस असून, विमाननगर पुणे येथे खाजगी नोकरी करून आपली उपजिविका करतात. त्यांच्याकडे स्विफ्ट कार असून घरगुती कामासाठी वापरतात. गुरुवारी सकाळी कंपनीत गेले व रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी शाळेजवळ असलेल्या राहत्या घराच्या समोर पार्क करून झोपी गेले होते.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी गाडी पार्क केलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. यावेळी पत्नीला फोन करून गाडी बाबत माहिती विचारली असता कोणी गाडी घेऊन गेले नाही. तसेच गाडीची चावी घरी असल्याची माहिती दिली. यामुळे परिसरातील अष्टापूर रोड, शिंदवणे रोड, पुणे सोलापूर रोड इत्यादी ठिकाणी चारचाकी गाडीचा शोध घेतला मात्र कोठेही आढळून आली नाही.
दरम्यान, यावरून खात्री झाली की, अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने चारचाकी चोरून नेहली. याप्रकरणी मोहसीन अत्तार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत. अनेक जण पार्किंगची सुविधा नसल्याने सर्रास रस्त्यावरच चारचाकी वाहने पार्क करतात. मात्र, या चोरीच्या पार्श्वभूमीवर लोकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.