छत्रपती संभाजीनगर : जगभरात रविवारी फ्रेंडशिप डे साजरा होत असताना मैत्रीच्या नात्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. लहानपणापासूनच्या मित्रानेच आपल्या जिवलग मित्राची निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने लोखंडी पाईपने मित्राच्या डोक्यावर वार करत त्याचा जीव घेतला.

ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे घडली आहे. या प्रकरणात मृत तरुणाचे नाव विकी बापू देवरे (वय 32, रा. देहाना, जि. नाशिक) असे आहे. तर आरोपी समाधान सिताराम बच्चाव (वय 32, रा. देहाना) याच्याविरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकी देवरे आणि समाधान बच्चाव हे दोघेही बालपणापासून एकमेकांचे जवळचे मित्र होते. गेल्या 5 वर्षांपासून ते खुलताबाद येथील शुलिभंजन परिसरातील प्लास्टिक पाईप तयार करणाऱ्या कारखान्यात एकत्र काम करत होते.
शुक्रवारी सुट्टी असल्याने विकी आपल्या खोलीत झोपला होता. त्याच वेळी दारूच्या नशेत असलेला समाधान तिथे आला आणि त्याने जोरात दरवाजा उघडला. अचानक झोपेतून उठलेल्या विकीने संतापाच्या भरात समाधानला शिवीगाळ केली. या छोट्याशा कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. राग अनावर झालेल्या समाधानने जवळ असलेल्या लोखंडी पाईपने विकीच्या डोक्यावर सलग तीन वार केले. या हल्ल्यात विकी गंभीर जखमी झाला. दरम्यान, त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी विकीला वाचवण्यासाठी तब्बल 5 तास शस्त्रक्रिया केली. मात्र डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याची प्रकृती सुधारली नाही. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
लहानपणीच्या मित्रानेच दारूच्या नशेत मित्राचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खुलताबाद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







