नेपाळ: नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक आणि अनेक विक्रम आपल्या नावावर करणारे निर्मल पुर्जा यांच्या निधनाची अधिकृत माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील ब्रॉड पीक परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर गिर्यारोहण क्षेत्रात शोककळा पसरली असून जगभरातील गिर्यारोहकांनी दुःख व्यक्त केले आहे.

मृत्यूपूर्वी काही तास आधी निर्मल पुर्जा यांनी आपल्या सहकाऱ्यांना एक संदेश पाठवला होता. त्यांनी ब्रॉड पीकच्या कॅम्प 2 मधून हवामान खराब असल्याची माहिती दिली होती. मोहिम पूर्ण झाल्यानंतर संपर्क साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. हा त्यांचा अखेरचा संदेश ठरला.

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मल पुर्जा हे पाकिस्तानातील काराकोरम पर्वतरांगेतील माऊंट K2 सर करायच्या मोहिमेवर होते. याच मोहिमेदरम्यान झालेल्या हिमस्खलनात ते अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला. K2 पर्वताच्या सुमारे 5600 मीटर उंचीवर ही दुर्घटना घडली.
निर्मल पुर्जा हे जगातील सर्वात आव्हानात्मक गिर्यारोहण कामगिरीसाठी ओळखले जात होते. त्यांनी अवघ्या 7 महिन्यांच्या कालावधीत जगातील 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची सर्व 14 शिखरे सर करण्याचा विक्रम केला होता. त्यांच्या या कामगिरीची नोंद आजही जागतिक विक्रम म्हणून कायम आहे.
अत्यंत प्रतिकूल हवामान, गोठवणारी थंडी, वेगवान वारे आणि अनेक अडचणींवर मात करत त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली होती. यानंतर त्यांनी अतिरिक्त ऑक्सिजनचा वापर न करता जगातील सर्व 14 उंच शिखरे सर करण्याचे आव्हानही पूर्ण केले होते.
या दुर्घटनेत निर्मल पुर्जा यांच्यासह अमेरिकेच्या मॅलरी गेइस, ओमानच्या नधिरा अहमद अब्दुल्ला अल हार्थी आणि नेपाळच्या पुर बहादूर गुरुंग यांचाही मृत्यू झाला आहे.
नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. काराकोरम पर्वतरांगेत विश्वविक्रमी गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांच्यासह अनेक गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याने मोठा धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. निर्मल पुर्जा यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे त्यांनी म्हंटले आहे.






