मुंबई: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार कौतुक केले आहे. ‘देवाभाऊ’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना त्यांनी फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर भाष्य केले. एका व्यक्तीमध्ये इतके वेगवेगळे गुण असणे दुर्मिळ असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, त्यांनी सांगितलं कि, या माणसाला काहीतरी दैवी शक्ती मिळालेली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे अनेक जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडतात. ते चांगले संघटक, कुशल प्रशासक आणि उत्तम मित्र आहेत. त्याचबरोबर वाचन, लेखन आणि कुटुंबाची जबाबदारीही ते तितक्याच समर्पणाने सांभाळतात. प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना लक्षात ठेवून ते शुभेच्छा किंवा सांत्वन देतात, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पाटील यांनी एका माजी मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले. त्यांनी नाव न घेता सांगितले की, काही नेत्यांकडे काम घेऊन गेल्यानंतर ते निवेदन काळजीपूर्वक वाचायचे, त्यावर काही खुणाही करायचे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला काम होईल अशी अपेक्षा निर्माण व्हायची. मात्र, प्रत्यक्षात अनेकदा त्यावर पुढे काही निर्णय होत नसत. पुन्हा विचारणा केल्यावर “नंतर सांगतो” असे उत्तर मिळायचे, असा दावा त्यांनी केला.






