दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील महिला कुस्तीपटूंच्या आरोपांच्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने ब्रिजभूषण सिंह आणि विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

2023 च्या सुरुवातीला या प्रकरणामुळे देशभरात मोठी चर्चा झाली होती. काही महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप करत दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात ऑलिम्पिकपटू विनेश फोगाटसह अनेक कुस्तीपटू सहभागी झाले होते. महिला खेळाडूंनी त्यांच्या चौकशी करण्याची मागणी केली होती.

यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी एका प्रकरणात अल्पवयीन कुस्तीपटूशी संबंधित तक्रारींचा समावेश होता. तपास पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. त्यानंतर 26 मे 2025 रोजी न्यायालयाने पॉक्सो कायद्याशी संबंधित आरोपांमधून ब्रिजभूषण सिंह यांना दिलासा दिला होता.
आताच्या निकालात सहा प्रौढ महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारींचा विचार करण्यात आला. सुनावणीदरम्यान काही तक्रारदारांनी यापूर्वी केलेल्या आरोपांबाबत वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे न्यायालयातील खटल्याची प्रक्रिया तीन महिला कुस्तीपटूंच्या आरोपांवर केंद्रित झाली.
या खटल्यात फिर्यादी पक्षाने एकूण 44 साक्षीदारांची माहिती न्यायालयात दिली होती. त्यापैकी 32 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षींचा विचार केल्यानंतर न्यायालयाने ब्रिजभूषण सिंह आणि विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.






