लोणी काळभोर, ता. १० : पुणे शहरातील दोन दिवसांचा मुक्काम पूर्ण करून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी (ता. ११) ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखी तळावर दाखल होत आहे. लाखो वारकऱ्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती ही दोन्ही गावे भक्तिमय वातावरणात नटली असून, प्रशासन, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी स्वागतासाठी जय्यत तयारी पूर्ण केली आहे.

‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या अखंड गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महसूल, आरोग्य, महावितरण, पोलीस, ग्रामपंचायत आणि इतर सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. निर्मल वारी अभियानांतर्गत ठिकठिकाणी मोबाईल शौचालये, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीजपुरवठा, स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत ६००, तर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत ४५० शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह उभारण्यात आले असून, वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फॉगिंग मशीनद्वारे धूरफवारणी करण्यात आली आहे. विविध ठिकाणी आर.ओ. प्लांटमधून मोफत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

स्वच्छता, पर्यावरण आणि वारकरी सेवेला प्राधान्य
पालखी मार्गावरील खडी, माती, राडारोडा आणि इतर अडथळे हटविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पालखी तळावर निर्जंतुकीकरणासह औषध फवारणी करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत प्लास्टिकमुक्त, प्रदूषणमुक्त आणि हरित पालखी सोहळ्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोणी काळभोर ग्रामपंचायतीने पालखी तळ, आठवडा बाजार मैदान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, गावठाण, प्रमुख रस्ते, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे मैदान, कन्या प्रशाला, मराठी शाळेचे मैदान तसेच गावातील सर्व मंदिरांची विशेष स्वच्छता करून परिसर सुशोभित केला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गालगत कचराकुंड्या ठेवण्यात येणार असून, विविध ठिकाणी आरोग्यविषयक जनजागृती स्टॉल उभारण्यात येणार आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन वारकऱ्यांसाठी जर्मन हँगर (वारकरी सेवा केंद्र) उभारण्यात आले आहे. भागवत एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी संध्याकाळी खिचडी, तर दुसऱ्या दिवशी सकाळी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
२४ तास आरोग्य सेवा; सहा रुग्णवाहिका सज्ज
लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहबूब लुकडे आणि डॉ. डी. जे. जाधव यांनी सांगितले की, वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विठ्ठल मंदिर परिसरात तात्पुरती आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय सहा रुग्णवाहिका, तात्पुरते आयसीयू, १०८ रुग्णवाहिकांवर डॉक्टर, २४ तास कार्यरत वैद्यकीय पथक तसेच आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. वारकऱ्यांना तातडीची उपचार सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
पालखी सोहळा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी एक पोलीस उपायुक्त, दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, १० पोलीस निरीक्षक, ३३ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ३८९ पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड व एसपीओ तसेच १०० पोलीस मित्र नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय पुणे शहर पोलीस मुख्यालयातील ५० अधिकारी व कर्मचारी पालखी सोहळ्यासोबत कायम राहणार असून, संपूर्ण मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची करडी नजर असणार आहे.
दरम्यान, संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती परिसर भक्ती, सेवा आणि शिस्तीचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी सज्ज झाला असून, लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन आणि ग्रामस्थ पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहेत.







