पुणे: पुण्यात पोलिसांची टोपी घालून कॅबचालकाला धमकावणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी तपास सुरू केला आणि संबंधित व्यक्ती पोलीस दलातील नसल्याचे समोर आले. मजहर मजीद शेख (27, रा. बुरूड आळी, शिरूर) असे या तरुणाचे नाव आहे.

गणेशखिंड रस्ता परिसरात हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. शेख हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. त्याच्याविरोधात महिला पोलीस अंमलदार अश्विनी गगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅबच्या वायपरमधून उडालेले पाणी डोळ्यांवर आल्याच्या कारणावरून त्याने चालकासोबत वाद घातला. त्यानंतर त्याने चालकाची गाडीची चावी काढून घेतल्याचे दिसत आहे. तसेच चालकाला शिवीगाळ करून धमकावल्याचाही आरोप आहे.

यावेळी कॅबमध्ये असलेल्या एका महिलेने शेखला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलीस असल्याचा आव आणत तिलाही दरडावले त्याने चालकाला ‘डायल 112’ वर फोन करण्याची धमकी दिली. तसेच ‘तू बाहेरचा आहेस, मी इथला आहे’ अशा शब्दांत त्याच्यावर दबाव टाकल्याचे समोर आले.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही चर्चा सुरू झाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांना चौकशी करण्याचे निर्देश दिले.
तपासादरम्यान संबंधित व्यक्ती पोलीस कर्मचारी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी शेखचा शोध घेत त्याच्याविरोधात कारवाई सुरू केली. या प्रकारामुळे पोलिसांचे नाव विनाकारण चर्चेत आले आणि दलाला टीकेला सामोरे जावे लागले.







