पुणे: पुणे-सातारा महामार्गालगत भोर तालुक्यात रविवारी पहाटे एक धक्कादायक हत्येची घटना घडली. 4 ते 5 जणांच्या टोळक्याने एका 28 वर्षीय तरुणाला घेरून धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला. सागर रामचंद्र पालवे (वय 28) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे भोर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

रांजे गावच्या हद्दीत, कोंढणपूर फाटा ते सिंहगड रस्त्यावर रविवारी पहाटे सुमारे 3 वाजता हा प्रकार घडला. अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आवाजाच्या दिशेने नागरिकांनी धाव घेतली असता सागर पालवे गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेला दिसून आला.

घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपासाला सुरुवात केली. प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादाचा या हत्येमागे संबंध असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक केतन मचले आणि सागर कोंढाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.
दरम्यान, पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातही गोळीबाराची घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून 5 जणांनी एका 20 वर्षीय तरुणावर गोळीबार केल्याचे समोर आले. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, संबंधित आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






