पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या बीड आणि पश्चिम महाराष्ट्राच्या थेट रेल्वे जोडणीला अखेर सुरुवात झाली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि गणेशोत्सवाचे औचित्य साधून बीड-हडपसर (पुणे) रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

गेल्या वर्षी १७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू करण्यात आली होती. आता बीडला थेट पुण्याशी जोडणारी रेल्वे सुरू झाल्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे. या सेवेमुळे बीड ते पुणे रेल्वे प्रवास सुमारे सात तासांत करणे शक्य होणार आहे.

पुणे-बीड ही गाडी क्रमांक ११४३३ पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज रात्री १०.४५ वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता बीड रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. तर बीड-पुणे गाडी क्रमांक ११४३४ बीडहून दररोज रात्री ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता पुण्यात पोहोचणार आहे.

या रेल्वेला उरुळी, दौंड कार्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, नारायणडोह, न्यू आष्टी आणि अंमळनेर येथे थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरील विविध गावांतील आणि शहरांतील नागरिकांना पुणे तसेच बीडकडे जाण्यासाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.
बीड-पुणे रेल्वेसेवा दररोज चालवण्यात येणार असून रेल्वेला एकूण १६ डबे असतील. एका फेरीत सुमारे दोन हजार प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता या गाडीची आहे. त्यामुळे बीड आणि परिसरातून पुण्यात शिक्षण, नोकरी तसेच इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी ही रेल्वे जोडणी महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, रेल्वेसेवेचा उद्घाटन सोहळा पार पडला असला तरी या गाडीच्या नियमित व्यावसायिक प्रवासाची अधिकृत तारीख रेल्वे बोर्डाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, उद्घाटनानंतर ही सेवा लवकरच सर्वसामान्य प्रवाशांसाठी नियमितपणे सुरू होण्याची अपेक्षा आहे.







