पुणे : चंदननगर परिसरात सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळाला कंटाळून ४० वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शुभांगी गरड असे मृत महिलेचे नाव असून त्या मूळच्या करमाळा येथील रहिवासी होत्या. हुंड्याची मागणी तसेच शारीरिक आणि मानसिक छळामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे.

शुभांगी आणि अभिजीत गरड यांचा विवाह जुलै २०२५ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही काळाने त्यांना सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. संसारोपयोगी वस्तू, भांडी आणि हुंड्याची मागणी करून त्यांचा छळ केला जात होता. तसेच पतीकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे आणि खाण्यापिण्यावर बंधने घातली जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सासू, सासरे, दीर आणि जाऊ यांच्याकडून किरकोळ कारणांवरून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सततच्या त्रासामुळे शुभांगी तणावाखाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

१३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास शुभांगी आणि त्यांचे पती अभिजीत यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर अभिजीत घराबाहेर गेल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर शुभांगी यांनी चंदननगर येथील राहत्या घरात आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी अभिजीत गरड, दिलीप गरड, अनिता दिलीप गरड, अक्षय दिलीप गरड आणि प्रियंका अक्षय गरड यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ आणि ८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अभिजीत गरड याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींबाबत तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.







