लोणी काळभोर, ता. १८ : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला 22 वर्षीय आरोपी लोखंडी हत्यार घेऊन दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी काळभोर परिसरात अंबरनाथ मंदिरामागील कुस्ती आखाड्याजवळ शुक्रवारी (ता.18) दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पियुष ऊर्फ युवराज गणेश भिसे (वय 22, रा. पाण्याच्या टाकीजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल राजाराम कर्डीले यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भिसे याला यापूर्वी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे जिल्ह्याच्या हद्दीबाहेर दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपारीचा आदेश लागू असतानाही तो लोणी काळभोर परिसरात आला. त्यावेळी त्याच्या हातात धारदार लोखंडी हत्यार होते. तसेच तो मोठमोठ्याने आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करत दहशत निर्माण करीत असताना पोलिसांना मिळून आला.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे 500 रुपये किमतीचे धारदार लोखंडी हत्यार जप्त केले आहे. आरोपी भिसेवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५, १४२ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस अंमलदार सय्यद करत आहेत.
ही कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार पोलीस निरीक्षक गुन्हे नंदकुमार कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे, पोलीस हवालदार अण्णा माने, निलेश कोल्हे, सुरज कुंभार, सागर जगदाळे, पोलीस अंमलदार सचिन सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.







