पुणे : पुण्यातील राजगुरुनगर भागात अत्यंत भयानक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक त्रासाला कंटाळून भाच्याने आधी स्वतःच्याच सख्ख्या मामाची गळा चिरून निघृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या करून जीवन संपवले. या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.

संदीप गडदे (मामा) आणि प्रविण कोहिनकर (भाचा) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर येथील एका भाड्याच्या घरात ही दुर्दैवी घटना घडली. प्रविणने मामा संदीप यांचा गळा चिरून खून केला आणि त्यापाठोपाठ स्वतःचे आयुष्य संपवले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. तपासादरम्यान पोलिसांना प्रविणने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक सुसाईड नोट आढळून आली आहे. या चिठ्ठीमध्ये त्याने मामाकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा स्पष्ट उल्लेख केला असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.

तथापि, भाच्याला मामाकडून नेमका कसला आणि कोणत्या कारणावरून त्रास दिला जात होता, तसेच या टोकाच्या पावलामागे आणखी काही कौटुंबिक किंवा आर्थिक वाद होते का, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. पोलीस पथकाने सुसाईड नोट आणि घटनास्थळावरील इतर सर्व भौतिक पुरावे ताब्यात घेतले असून त्या आधारे पुढील सखोल तपास सुरू आहे.
गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणात घडलेल्या या भयानक प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.







