पुणे : पुणे आणि परिसरात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) ४,४६२ सदनिकांच्या सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ऑनलाइन कागदपत्रे अपलोड आणि पडताळणी करताना अर्जदारांना तांत्रिक अडचणी येत असल्याने म्हाडाने अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. आता या घरांची सोडत २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे.

म्हाडाने २४ ऑगस्ट रोजी ४,४६२ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, ऑनलाइन कागदपत्रे सादर करताना अनेक अर्जदारांना अडचणी येत असल्याने ही मुदत एक महिन्याने वाढविण्यात आली आहे. आता इच्छुक नागरिकांना १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या सोडतीमध्ये पुणे महापालिका क्षेत्रातील १,४६८, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील १,४०६ आणि पीएमआरडीए क्षेत्रातील १,५८८ सदनिकांचा समावेश आहे. यामध्ये २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील २,९७१ आणि १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील १,४९१ घरांचा समावेश आहे. याशिवाय मागील दोन सोडतींमध्ये शिल्लक राहिलेल्या ५५८ सदनिकाही यामध्ये आहेत.

अर्जदारांना १५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कम (EMD) भरता येईल. आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध होणार आहे. त्यावर १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दावे आणि हरकती नोंदवता येतील. अंतिम यादी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर केली जाणार आहे.
त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सोडत काढण्यात येईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता विजेत्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उत्पन्नाच्या कागदपत्रांबाबतही अर्जदारांना दिलासा देण्यात आला असून, २०२४-२५ किंवा २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षाचा उत्पन्न दाखला किंवा आयटी रिटर्न सादर करता येणार आहे.







