लोणी काळभोर, ता. 21 : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील श्रीमंत छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम उत्साह, जल्लोष आणि मनोरंजनाच्या वातावरणात रविवारी (ता.20) पार पडला. ओम यादव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला लोणी काळभोर, कदमवाकवस्ती तसेच परिसरातील महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमात विविध खेळ, मनोरंजनाचे उपक्रम आणि आकर्षक बक्षिसांची रेलचेल असल्याने महिलांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. विविध स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली. उपस्थित मान्यवर, नागरिक आणि महिला भगिनींच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, फुरसुंगी-उरुळी देवाचीचे उपनगराध्यक्ष ओंमकार कामठे, कदमवाकवस्तीच्या माजी सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच नाशिर पठाण, ग्रामपंचायत सदस्य राजश्री काळभोर, रूपाली काळभोर, स्मिता लोंढे, बिना काळभोर, माजी सदस्य माधुरी काळभोर, रुक्मिणी चांदणे, वसुंधरा केमकर, अशोक शिंदे, पृथ्वीराज काळभोर, माजी सदस्य अजय घुले, सतीश काळभोर, अभिजित बडदे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

विशेष म्हणजे, कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला. विविध खेळ आणि मनोरंजनाच्या उपक्रमांमुळे कार्यक्रमातील उत्साह पहाटेपर्यंत कायम होता. अखेर सोमवारी (ता.21) पहाटे साडेचार वाजता कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे श्रीमंत छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळ ट्रस्टच्या उपक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा झाली.
सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम
कदमवाकवस्तीतील संभाजीनगर परिसरात 2015 मध्ये ग्रामपंचायत सदस्य अविनाश ऊर्फ पप्पू बडदे यांच्या पुढाकारातून श्रीमंत छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासूनच मंडळाने गणेशोत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड दिली आहे. रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, नवमतदार नोंदणी शिबिर यांसह विविध सामाजिक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येतात.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी अध्यक्षपदी यश साकोरे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत मरगुत्ती, तर उत्सवप्रमुखपदी बाबाराजे भालेराव यांची जबाबदारी आहे. सामाजिक उपक्रमांसोबतच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून नागरिकांचा उत्सवातील सहभाग वाढविण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले.







