वाकड, पुणे : बहिणीची छेड काढल्याच्या संशयातून तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याची हत्या केल्याची घटना वाकड येथे घडली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मारोती बाळासाहेब बनसोडे (वय 35, रा. बोधेगाव, ता. परळी, जि. बीड, सध्या रा. बौद्धनगर, दत्तनगर, चिंचवड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत मारोती यांचे मामा सुग्रीव लक्ष्मण गायकवाड (वय 54, रा. स्प्रिंग गार्डन सोसायटी, बोराडेवाडी, मोशी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अमित दशरथ साळुंखे (वय 26, रा. जगतापनगर, थेरगाव, मूळ रा. सोमेश्वर वाकी, ता. बारामती), किशोर सुभाष वाघमारे (वय 39, रा. पवारनगर, थेरगाव) आणि भारत संजय पवार (वय 23, रा. पवारनगर, थेरगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारोती बनसोडे आणि आरोपी हे मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मारोती याने बहिणीची छेड काढल्याचा आरोपींना संशय होता. 19 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मारोती वाकड येथील कावेरीनगर भाजी मंडईसमोरील मोकळ्या जागेत आला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला गाठून बहिणीची छेड का काढतोस, अशी विचारणा केली.

यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी मारोतीच्या तोंडावर, गळ्यावर, हनुवटीवर आणि गुप्त भागावर हत्याराने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात मारोती गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
या घटनेनंतर वाकड पोलिसांनी तपास सुरू करून तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर भोकरे करीत आहेत.







