पुणे : कोथरूड ते पाषाण-पंचवटीदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी प्रस्तावित सुतारदरा-पाषाण बोगद्याच्या आराखड्यात पुणे महापालिकेने बदल सुचविला आहे. पाषाणच्या बाजूला पूर्वी प्रस्तावित असलेल्या पंचवटी-एनसीएल मार्गाऐवजी पंचवटी-अभिमानश्री-लॉयला शाळेजवळून बोगद्याला जोडणारा नवीन रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. या बदलामुळे प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड आणि डोंगरफोड तुलनेने कमी होईल, असा महापालिकेचा दावा आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता बोगदा आणि भूमिगत मार्गांच्या माध्यमातून प्रमुख भागांना जोडण्यावर महापालिकेचा भर आहे.

पुणे शहरात दरवर्षी सुमारे तीन लाख नवीन वाहनांची भर पडत असल्याने प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढत आहे. त्यातच महापालिका हद्द २४३.८४ चौरस किलोमीटरवरून ५१७ चौरस किलोमीटरपर्यंत विस्तारली आहे. मात्र, विविध कारणांमुळे अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे पाषाण, कोथरूड, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, स्वारगेट आणि कात्रज परिसरात वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

सध्या पाषाणहून कोथरूडला जाण्यासाठी चांदणी चौक किंवा सेनापती बापट रस्ता-विद्यापीठ मार्गाचा वापर करावा लागतो. या मार्गावर अनेक चौक आणि सिग्नल असल्याने सुमारे १० ते ११ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहतुकीनुसार ४० ते ६० मिनिटांचा वेळ लागतो.
ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे तीन किलोमीटर लांबीचा पाषाण-पंचवटी-कोथरूड बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. टेकडीखालून जाणाऱ्या या बोगद्यामुळे पाषाण रस्ता, पंचवटी रस्ता आणि पौड रस्ता थेट जोडण्याचे नियोजन आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाषाण ते कोथरूड प्रवासाचा वेळ १० ते १५ मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







