पुणे : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी बहुप्रतीक्षित पुणे-बीड रेल्वेसेवा आता नियमितपणे सुरू होणार आहे. पुण्याहून २२ सप्टेंबरपासून, तर बीडहून २३ सप्टेंबरपासून ही सेवा दररोज धावणार आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या रेल्वेसेवेचे उद्घाटन करण्यात आले. नियमित सेवा सुरू झाल्याने पुणे आणि बीडदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार, पुणे-बीड गाडी क्रमांक ११४३३ रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी पुणे स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता बीडला पोहोचेल. बीड-पुणे गाडी क्रमांक ११४३४ रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी बीड स्थानकातून सुटणार असून, पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.
या मार्गावर सध्या वेगाच्या मर्यादेमुळे रेल्वेचा प्रवास सात तासांपेक्षा अधिक वेळ घेत आहे. सुरुवातीला ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार आहे. भविष्यात या मार्गावर गाडीचा वेग ताशी ११० किलोमीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुणे-बीड प्रवासाचा कालावधी सुमारे सहा तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी या रेल्वेला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, नारायणडोह, नवीन आष्टी आणि अमळनेर या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे या स्थानकांजवळील नागरिकांनाही पुणे आणि बीडकडे जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून दुसऱ्या रेकसाठी डब्यांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू आहे. पुणे-बीड रेल्वेसेवेमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना दळणवळणाची सुविधा मिळणार असून, शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी दोन्ही शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.







