शिरूर : शिरूर शहरामधील लाटे आळी परिसरातील आंबेडकरनगर येथे जुन्या वादातून तरुणावर गोळीबार करून त्याचा खून केल्याच्या प्रकरणातील तीन आरोपींना शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सुपा (जि.अहिल्यानगर) टोलनाका परिसरातून आज(ता.19)शिताफीने जेरबंद केले.रोहित रविंद्र सोनवणे(वय 24,रा.करडे,ता.शिरूर, जि.पुणे),अनिकेत विलास गव्हाणे(वय 23, रा.गव्हाणवाडी,ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) आणि आदित्य दादाभाऊ पवार (वय 19,रा.गव्हाणवाडी, ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.18) सकाळी साडेसहाच्या सुमारास शिरूर शहरातील लाटे आळी, आंबेडकरनगर येथे तौफिक अन्सारी यांच्या घरासमोर रस्त्यावरून जात असताना वरील तीनही आरोपींनी दोन लाख रुपये खिशातून काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून त्यापैकी रोहित सोनवणे याने त्याच्या जवळील पिस्तुलातून हरीश दादाभाऊ गंगावणे (वय ३४,रा. कमाठीपुरा-शिरूर,जि.पुणे) यांच्या कानाच्या मागील बाजूस व मानेच्या उजव्या बाजूस गोळी झाडली. या गोळीबारात गंभीर जखमी झाल्यामुळे गंगावणे यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात विविध कलमे तसेच शस्त्र अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहिती मिळताच पोलिसांची सापळा रचून कारवाई

खुनाच्या गंभीर घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस अंमलदार यांना आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले.
तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी सुपा टोलनाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तपास पथकाचे स्वतंत्र पथक तयार करून सुपा टोलनाका परिसरात रवाना केले.त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व डी.बी.पथकाचे अंमलदार यांनी सापळा रचून तीनही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये रोहित सोनवणे(वय 24),अनिकेत गव्हाणे (वय 23) आणि आदित्य पवार (वय 19) यांचा समावेश आहे.
आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे
पोलिसांच्या माहितीनुसार,या आरोपींवर यापूर्वीही अवैध गावठी पिस्तुल बाळगणे,मारामारी,जबरी चोरी यांसारख्या गंभीर व दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे सदर खून प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने करण्यात येत असून, आरोपींकडून गुन्ह्याबाबत आणखी माहिती मिळविण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल,अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले व पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण,पोलीस अंमलदार नितेश थोरात,विजय शिंदे,निरज पिसाळ,निखिल रावडे,अंबादास थोरे,सचिन भोई,राहुल वाघमोडे, दादाराव नागरे,अजय पाटील आदींच्या पथकाने सहभाग घेतला होता.






